मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. महायुती बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांना गुढी पाडव्याला घेतलेल्या सभेत जाहीर केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे पडसाद मनसेमध्ये उमटू लागले आहे. त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. मनसेत पडलेली ही पहिली ठिणगी आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होते. तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सभांना मी उपस्थित होतो. सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात ते विचार मांडत होते. २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होता. आता ते पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे, असे कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे सरचिटणीस पदावरुन आपण राजीनामा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?
कीर्तीकुमार शिंदे हे पक्षाचे सरचिटणीस होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अडगळीत पडले होते. त्यांना पक्षातील निर्णयात आणि कामगार सेनेबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयात समावून घेतले जात नव्हते. यामुळे ते नाराज होते. आता त्यांचा राजीनामा म्हणजे त्या नाराजीला मिळालेले निमित्त आहे. आता कीर्तीकुमार शिंदे यांच्यानंतर पक्षातील आणखी कोण राजीनामा देणार का? हे ही काही दिवसांत दिसणार आहे.
राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देऊन विधानसभेच्या कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. परंतु लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यावी? महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे का? या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी दिली नाही. यामुळे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीबाबत संभ्राम आहे.