लखनौ- उत्तर प्रदेशः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 05 जून रोजी अयोध्येत जाहीर सभा घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या पाठिशी भाजप (BJP) उभे असल्याचे चित्र दिसत असले तरीही उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मात्र एका भाजप खासदारानेच राज ठाकरेंसमोप तगडं आव्हान उभं केलं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे. आता तर राज ठाकरे हे दुष्ट आणि कालनेमी असल्याचा अरोप त्यांनी केला. तसेच अयोध्येत राज ठाकरे यांना पाय ठेवू देणार नाही. राज ठाकरे हिंदूवादी नाहीत तर कालनेमी आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरादेखील वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी. नंतरच त्यांनी अयोध्येत जावे. नाही तर मी त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश करू देणार नाही. राज ठाकरे यांनी नेहमीच उत्तर भारतीविरोधात पवित्रा घेतला आहे.काही वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात उत्तर प्रदेशातील तरुणांना त्यांनी माकरहाण देखील केली आाहे. मात्र अचानक त्यांचे रुप कसे पालटले ? कालनेमी राक्षसाप्रमाणे तेदेखील अयोध्येला दर्शनासाठी जाणार असून त्यांची ही गुंडागर्दी आम्ही सहन करणार नाहीत, असा इशारा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनी अयोध्येत सभा घेतली तर मोठं आंदोलन छेडलं जाईल. कोणत्याही किंमतीत राज ठाकरेंना लखनौ विमानतळावरून बाहेर येऊ देणार नाही, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना खासदारांनी आज शपथ दिली. कोणत्याही स्थितीत राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ द्यायचं नाही. रस्त्यावरच त्यांना घेराव घातला जाणार. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे हात जोडून माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा विरोध थांबणार नाही. लाखोंच्या संख्येने 05 जून रोजी अयोध्येत रस्त्यावर लोक उतरून राज ठाकरे यांना विरोध करतील. यासाठी तयारी सुरु झाली आहे, असा इशारा भाजप खासदाराने दिला आहे.
कैसरगंज लोकसभा मतदार संघाअंतर्गत बहराइच लखनौ हायवेवर अनेक ठिकाणी ब्रिजभूषण यांनी पोस्टर्स लावले आहेत. आगामी पाच जूनला मतदार संघातील क्षेत्रात लोकांनी अयोध्येला पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच उत्तर भारतीय हे रामाचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांचा अपमान हा रामाचा अपमान असल्याचं ब्रिजभूषण यांनी ठणकावून सांगितलं आहे.