केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आज महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा नागपुरात कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. “मी शिर्डीत लढण्यासाठी इच्छुक होतो. अजून एखादी जागा मिळाली असती तर दोन जागा आमच्या निवडून आल्या असत्या. लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला जागा मिळाली नाही. विधानसभेत तीन ते चार जागा मिळतील याची अपेक्षा होती. मात्र एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे”, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
“देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांनी अनेकवेळा आम्हाला एमएलसी आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विधानसभा निवडणुकीत सांगितलं होतं की जागा देत नसाल तर आम्हाला मंत्रिमंडळात पहिल्यांदा सन्मान द्या. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगितलं होतं की, तुम्हाला मंत्रिपद देऊ. मात्र अडीच वर्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही”, अशा शब्दांत रामदार आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.
“आम्ही प्रामाणिकपणाने महायुती आणि भाजपसोबत आहोत. आमचा पक्ष मोठा आहे. मात्र आमच्या पक्षात कुठल्या कार्यकर्त्यांना मंत्रीपद मिळत नाही ही बाब मनाला दुःख देणारी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्याने आमच्या पक्षात नाराजी आहे. आमचा पक्ष तुमच्यासोबत असताना असं करत असाल तर ही बाब गंभीर आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
“पहिल्या टप्प्यात आम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. काहीच आमदारांचा शपथविधी आहे. मात्र राहिलेली दोन मंत्रीपद आम्हाला देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणीस ही मागणी पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. मला एकट्याला मंत्रीपद मिळाले. मात्र माझ्या पाठीशी उभे आहेत त्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळावी ही अपेक्षा आहे”, अशी आशा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
“मंत्रिपदासाठी आमची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामधील जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलण झालं होतं. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सागितलं. मात्र मी दोन दिवस दिल्लीत जाणार आहे. तेव्हा त्यांच्याशी पुन्हा बोलणार आहे. फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आमचे कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं. त्यामुळे आमची नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहून आम्ही त्याच्यांसोबत आहोत. मात्र भाजप अमचा विचार करत नाही”, अशीदेखील खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
“नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला ही आनंदाची बातमी आहे. महायुतीला सर्व समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. महायुतीला लाडकी बहीण योजने मुळे जास्त फायदा मिळाला. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. आमचा निर्धार पक्का मग का मिळणार नाही महाविकास आघडील धक्का, मविकाला धक्का देण्याचं काम मतदारांनी केलं”, असंदेखील रामदास आठवले यावेळी म्हणाले.