महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार, महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचा इशारा, आठवलेंचे कार्यकर्ते संतापले

| Updated on: Oct 24, 2024 | 10:02 PM

महायुतीत छोट्या पक्षांना विचारात घेतलं जात नाही असा आरोप याआधी रासप नेते महादेव जानकर यांनी केला. महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देखील दिली. त्यानंतर आता रामदास आठवले यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी महायुतीला मोठा इशारादेखील दिला आहे.

महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार, महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचा इशारा, आठवलेंचे कार्यकर्ते संतापले
रामदास आठवले
Follow us on

महायुतीमध्ये जागावाटपात रिपब्लिकन पक्षावर घनघोर अन्याय होत असल्याने नाराज रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आज महायुती विरुद्ध एल्गार पुकारता जोरदार घोषणाबाजी केली. “जागावाटपात सन्मानजनक तोडगा काढला जात नाही, रिपब्लिकन पक्षाला सन्मान जनक जागावाटप दिले जात नाही तोपर्यंत रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार करण्याचा आज रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. दोन दिवस वाट बघून महायुती की महाविकास आघाडी कुणाचा प्रचार करायचा याचा रिपब्लिकन पक्ष निर्णय घेईल”, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले घेतील तो आम्हाला मान्य राहिल, असा निर्णय घेऊन आज रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुती विरुद्ध केलेले आंदोलन स्थगित केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर आदी अनेक नेत्यांनी आजच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. महायुतीत घटक पक्षांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे. कारण रामदास आठवले यांचा पक्ष आक्रमक होण्याआधी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे देखील आक्रमक झाले. महादेव जानकर यांनी तर महायुतीला सोडचिठ्ठी देत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला.

महाविकास आघाडीत घटकपक्षांसोबत चर्चा

दुसरीकडे महाविकास आधघाडीत छोट्या पक्षांचं अस्तित्व लक्षात ठेवून त्यांचा विचार केला जात असल्याचं चित्र आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीत घटकपक्षांसोबत चर्चा सुरु आहे. कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. महाविकास आघाडीत विलेपार्ले मतदारसंघ आम आदमी (आप) पक्षाला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये आपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी संजय राऊत आणि नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत मविआच्या तीनही पक्षांमध्ये 85-85-85 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. तसेच 18 जागांबाबत घटकपक्षांसोबत बोलणी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची चर्चा करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी आणि आप पक्षाच्या मुंबईच्या नेत्या प्रीती मेनन यांनी संजय राऊत यांची सामना वृत्तपत्राच्या कार्यालायत जावून भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, विलेपार्ले मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला दिली जावू शकते.