सांगली: कधी कविता… कधी मिश्किल वक्तव्य… कधी कुणाला पक्षात येण्याचं आमंत्रण दे… तर कुठेही अन्याय अत्याचार झाल्यास घटनास्थळी धावून जा… अशा विविध कारणाने रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) नेहमीच चर्चेत असतात. आता ते आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत. मातृदिनाप्रमाणेच आता पत्नी दिनही (wife day) साजरा करायला हवा, असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. जागतिक मातृदिन साजरा (mother day) करणे हा चांगला उपक्रम आहे. आईचे उपकार कधीही फिटू शकत नाहीत. स्त्रिची अनेक रूपे आहेत. स्त्रीचे मातृरूप हे जगात वंदनीय आहे. स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे. स्त्रीची आई, बहीण, पत्नी अशी अनेक रूपे आहेत. मातृदिनाप्रमाणेच पत्नी दिन ही साजरा केला पाहिजे, असं आठवले म्हणाले. आई ही जन्म देते, वाढविते संस्कार देते. तशी पत्नीही माणसाला साथ देते. संसारात उभी करते. यशस्वी पुरुषामागे स्त्रीची प्रेरणा आणि साथ असते. त्यामुळे मातृदिनाप्रमाणे पत्नीदिन साजरा करून पत्नीचाही गौरव केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
सांगलीतील राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे जागतिक मातृदिन निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 चे वितरण रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील, मालूश्री विठ्ठल पाटील, रिपाइंचे प्रदेश सचिव आणि माजी महापौर विवेक कांबळे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल बापू पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, विक्रम सावंत, रिपाइंचे सुरेश बारशिंग, रिपाइं जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वसुमती विजयराज ओसवाल, सुशीला कृष्णराव जगताप, उषा दिनेश घाडगे, हारुबाई बयाजी अजेटराव, भागूबाई मारुती कोळेकर, मंगल बापू तोडकर, शशिकला विश्वनाथ खंबाळकर, संपत्ती विष्णू सोनटक्के, छाया नामदेव पाटील, वैशाली भगवान बोते, लक्ष्मीबाई शामराव गिड्डे पाटील या मातांचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला.
जत हा दुष्काळी भाग आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागात राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पडण्याचा पर्यायावर विचार करावा. जत भागातील पण्याचे दुर्भिक्ष्य मिटविण्यासाठी आवशयक म्हैसाळ प्रकल्पाच्या 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी राज्य सरकार नवं अद्याप निधी दिलेला नाही. त्यासाठी त्वरित निधी द्यावा या मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविणार आहोत. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 कृषी कायदे केले होते. मात्र शेतकरी आंदोलनामुळे ते कायदे त्यांनी रद्द केले. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पाठीशी मोदी सरकार उभे आहे, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळ निवारण करण्यासाठी आणि महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नडोजोड प्रकल्प देशाला सुचविला. मात्र नदी जोड प्रकल्पावर काँग्रेसच्या काळात विचार करण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहेत. महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आहे. पण तेही नदी जोड प्रकल्प सुरू करीत नाहीत. महाविकास आघाडी माणसे जोडत नाही तर नदी कधी जोडणार? असा सवालही त्यांनी केला.