‘…तर हे देश सोडून गेले असते’; दिशा सालियन प्रकरणात रामदास कदमांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 20, 2025 | 3:00 PM

दिशा सालियनच्या वडिलांनी  मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर हे देश सोडून गेले असते; दिशा सालियन प्रकरणात रामदास कदमांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी  मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचं नारायण राणे सुरवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत. शिवसेना प्रमुखांच्या नातू वर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी लाज असती तर ते देश सोडून गेले असते. पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली, त्यांचा मुलगा आणि नातू यांच्यावर जर असे आरोप होत असतील तर ही बाबत अत्यंत गंभीर आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल, असं कदम यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया 

दरम्यान या प्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे आता कोर्टात बोलू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.