मुंबईः शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शनिवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली. जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. कदमांनी लिहलेले हे पत्र जसेच्या तसे…
शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
रामदास कदम यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, सूर्यकांत दळवी माझ्यावर वारेमाप टीका करतो. ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये त्याने उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे.
कदम पुढे म्हणतात की, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत मागील चार वर्षांपासून (महाआघाडीच्या आधीपासून) काम करीत आहे. नुकत्याच नारायण राणे यांच्या जनयात्रेमध्ये ज्यांनी आवर्जुन हजेरी लावली. त्यात सूर्यकांत दळवीची (सूर्याजी पिसाळ) पक्षातून हकालपट्टी का होत नाही. याचे आकलन नाही, अशी खंतही त्यांनी नोंदवली आहे. सोबतच मनसेचा नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या भ्रष्टाचाराला आपलेच मंत्री खतपाणी घालतात. त्याला मदत करतात. मग आपल्या (शिवसेनेच्या) मंत्र्यांचा हेतू काय, फक्त रामदास कदम याला संपविणे असाच आहे का, असा प्रश्नी त्यांनी पत्रातून विचारला आहे.
रामदास कदम पुढे म्हणतात की, उद्धवजी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे प्रकरण गाजत आहे. त्या साई रिसॉर्टच्या उद्घाटनच्या पूजेला राष्ट्रवादीचा माजी आमदार व मनसे नगराध्यक्ष कसा जातो? त्याचे फोटोसह आपल्याला पुरावे देईन. मी, आम्ही नेमके काय करायचे? मात्र, मी शिवसेनेचा नेता आहे, त्याचे भान आहे. त्यामुळे आजपर्यंत किरीट सोमय्या यांच्याकडे कधीही संपर्क साधला नाही, बोललो नाही व त्यांच्याशी काहीही संबध नाही, याचा खुलासाही त्यांनी या पत्रातून केला आहे.
कदम पत्राच्या शेवटी म्हणतात की, जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करून भेटी अंती सविस्तर बोलू, असेही म्हटले आहे.