पूरग्रस्त चिपळूणकरांना राष्ट्र सेवा दलाचा मदतीचा हात, 3 दिवस तळ ठोकून आरोग्यसेवा

| Updated on: Aug 03, 2021 | 7:38 PM

चिपळूणला महापुराचा वेढा पडला. दोन दिवस शहर पाण्याखाली होतं. त्यामुळे या संकटाच्या काळात राष्ट्र सेवा दलही मदतीला धावून आलं. सेवा दलाच्या पथकाने महाड आणि चिपळूणमध्ये धान्य, कपड्यांसोबतच वैद्यकीय सेवाही दिली.

पूरग्रस्त चिपळूणकरांना राष्ट्र सेवा दलाचा मदतीचा हात, 3 दिवस तळ ठोकून आरोग्यसेवा
Follow us on

रत्नागिरी : चिपळूणला महापुराचा वेढा पडला. दोन दिवस शहर पाण्याखाली होतं. त्यामुळे या संकटाच्या काळात राष्ट्र सेवा दलही मदतीला धावून आलं. सेवा दलाच्या पथकाने महाड आणि चिपळूणमध्ये धान्य, कपड्यांसोबतच वैद्यकीय सेवाही दिली. मुंबईतील 14 डॉक्टरांच्या पथकाने 3 दिवस चिपळूणमध्ये तळ ठोकून पूरग्रस्तांची तपासणी केली आणि त्यांना औषधं दिली. या कामात मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील चिन्मय ठाकूर यांचा मोलाचा वाटा या तरुण डॉक्टरांनी पुढाकार घेतला.

या वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी चिपळूणमधील शंकर वाडी, बाजार पेठेतील गांधी चौक, खेराडी कॉम्प्ले्स, चिंचनाका, बहादुर शेख नाका, उक्ताड, गोवळकोट, भुरणवाडी, खेर्डी, भोगाळे, राधाकृष्ण नगर, रावतळे, कालुस्ते आदी भागात सेवा दिली. ठिकठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी बसून तसेच घराघरात जाऊन लोकांना आरोग्य सेवा दिली. ताप, सर्दी, पायाला चिखली अशा आजारावर लोकांना औषधे दिली.

“घराघरात जाऊन वैद्यकीय तपासणी आणि औषध वाटप”

या उपक्रमाविषयी सांगताना राष्ट्र सेवा दल मुंबईचे अध्यक्ष शरद कदम म्हणाले, “चिपळूण आणि परिसरातील लोक गेले 8 दिवस प्रचंड त्रासातून जात आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा त्रास दिसतो आहे. अंगदुखी, ताप, सर्दी, पायाला झालेल्या जखमा हे सारे बाह्य आजार दिसत असले तरी मानसिक ताणाने सगळे ग्रस्त आहेत. हा ताण हलका करण्याचा प्रयत्न या वैद्यकीय पथकाने जरुर केला आहे. हे वैद्यकीय पथक घराघरांतून गेले. पूरग्रस्त चिपळूणकरांना राष्ट्र सेवा दल मुंबईच्या पुढाकाराने मिळालेल्या या आरोग्यसेवेने दिलासा मिळाला आहे.”

“आपतग्रस्त भागात येऊन लोकांची सेवा करताना मोलाचं शिक्षण”

“वैद्यकीय पथकातील तरुणांना एक वेगळी अनुभूती या निमित्ताने येत होती. “आम्हाला वैद्यकीय शिक्षण जरूर मिळते पण अशा पद्धतीने आपतग्रस्त भागात येऊन लोकांची सेवा करताना आमचं मोलाचं शिक्षण झालं आहे. हा अनुभव कधीही विसरता येणारा नाही” अशा प्रतिक्रिया या तरुणांनी व्यक्त केली आणि इथे येण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्र सेवा दलाचे ऋण व्यक्त केले,” असंही शरद कदम यांनी नमूद केलं.

आमदार शेखर निकम हे उक्ताड या गावात आले असता या डॉक्टरांची टीम घराघरात जाऊन तपासणी करताना पाहिली. त्यांनी राष्ट्र सेवा दलाने घेतलेल्या या पुढाकाराचे आणि या टिममधील डॉक्टरांचे कौतुक केले. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूणमध्ये पाहणी करीत असताना या वैद्यकीय पथकाचे काम पाहून नायर हॉस्पिटल मधील चिन्मय ठाकूर याच्याशी चर्चा करून त्यांचे कौतुक केले. पत्रकार युवराज मोहिते यांनी वारंवार या पथकाशी संवाद साधत प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जाऊन वेगवेगळ्या भागात भेटी दिल्या.

“घरात, दुकानात, क्लिनिकमध्ये जाऊन माती काढण्याची मोहिम”

घराघरात जाऊन धान्य वाटप, घरात, दुकानात, क्लिनिकमध्ये जाऊन श्रमसहयोगाने माती काढणे आणि डॉक्टरांच्या सहकार्याने मेडिकल कँप राबवणे या 3 पातळ्यांवर राष्ट्र सेवा दलाने या भागात काम सुरू केले आहे. काम खूप आहे. ते विविध पातळ्यांवर नियोजनबध्द पध्दतीने केले जात आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शिस्तबध्द नियोजनाखाली चालू असलेले हे काम चिपळूणकरांसाठी मोलाचे ठरत असेल यात शंकाच नाही.

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते प्रा. राम साळवी, प्रा.डॉ.ज्ञानोबा कदम, निसार अली, शरयू इंदुलकर, प्रकाश डाकवे, निर्मला कांबळे, सतीश शिर्के, अनिल काळे, सई वरवटकर, शैलेश वरवटकर, स्मृती राणे, जहिद खान, अनिश महाडिक, अभिषेक तटकरी, अराफत सुर्वे, प्रवीण भूरन, निखिल भोसले यांनी ही आरोग्य सेवा चिपळूणमधील अनेक भागात नेण्याचे काम केले. Rotaract Club of the Caduceus सोबत चिन्मय ठाकूर, श्वेता डावकर, श्राव्य शेट्टी, अमुल्या हांडे, निकिता चांडक, संकेत निरबन, संकेत पाटील, चंद्रशेखर राय, सिमरन गवळी, अश्विन गोविल, नंदन सोनुरलेकर, अभिलाष सिंग, सबरीन अन्सारी, अमेय कुलकर्णी या चौदा तरुणाचे वैद्यकीय पथक तीन दिवस चिपळूणमध्ये आरोग्य सेवा देत होती.

हेही वाचा :

नोटबंदीनं अर्थव्यवस्था खिळखिळी, उद्योग-धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त, लाखो बेरोजगार झाले : अमर्त्य सेन

“शेती विरोधी कायदे मागे घ्या”, 10 लाख सह्यांचं निवेदन देत राष्ट्र सेवा दलाची राज्यपालांकडे मागणी

‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Rashtra Seva Dal is doing Flood relief work in Chiplun and Mahad