“नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी प्रचार दरम्यान विकासाच्या मुद्द्यावरच बोलत होतो. पण विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे वैयक्तिक टीका करण्यात येत होत्या. शिवसेना खासदार संजय जाधव तर माझे धोतर फिरतो, असे जाहीर म्हणत होते. मी त्यांना थेट चॅलेंज करतो की, खासदार साहेब तुमच्यात दम असेल तर या आणि माझे धोतर फाडून दाखवा, नाही तुमची पॅन्ट फाडून तुम्हाला वापस पाठवली तर नावाचा रत्नाकर गुट्टे नाही”, असे म्हणत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांना थेट आव्हानच दिले आहे. जिल्ह्यातून उबाठा गट उपटून टाकतो, असंही वक्तव्य आमदार गुट्टे यांनी केलं आहे.
“महायुतीच्या काहीच लोकांनी विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम केलं. बाकी जे सर्वच कडक कपडे घालणारे नेते असतात, ते किती सोबत होते ते मला माहिती. प्रत्येकाने बरंच काही केलं. पण त्यांच्या स्वत:च्या गावात ते होऊ शकलं नाही. कारण सगळे विरोधक माझ्या विरोधात असले तरी जनता माझ्या पाठिशी होती. माझे सर्व कार्यकर्ते सोबत होते. फक्त नेते होते, बाकी खालचे कार्यकर्ते काम करत नव्हते. तोंडावर फक्त थोडंफार काम करतोय, असं नेते दाखवायचे. पण खाली काम कुणीच करायचं नाही. ही परिस्थिती तीनही तालुक्यात होती”, असा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केला.
“मी या जनतेचे आणि मतदारंसघाचे कसे उपकार मानू यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या निवडणुकीत एकाही नेत्याला वाटत नव्हतं की मी निवडून येईन म्हणून. त्यांचं गणित असं होतं की, वेगवेगळे उमेदवार ओबीसींचे मते खाणार. त्यांनी हिशोब लावला, जशी लोकसभेची निवडणूक होईल, तशीच विधानसभेची निवडणूक होईल. तशी झाली सुद्धा. मला 25 ते 30 टक्के मराठा समाजाचे मते मिळाली. मुस्लिम समाजाचे मते मिळाले. सर्वात जास्त कधी न मतं मिळणारे बौद्ध समाजाचे देखील मला मतं मिळाली. इथे गंगाखेडमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त मला बौद्ध समाजाचे मते मिळाली”, असं रत्नाकर गुट्टे म्हणाले.
“मला ओबीसी समाजाने तारलं. ओबीसी आणि मायक्रो ओबीसींनी मोठं मतदान केलं. मायक्रो ओबीसींचे या मतदारसंघात 84 हजार मतदार आहेत. सगळ्यांची नावे घेता येणार नाही. पण सर्व ओबीसी आणि मायक्रो ओबीसींनी मला तारलं. त्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे. बाकी सगळ्यांचा हातभार लागला. मला मान्य आहे. पण या हातभारमध्ये 70 टक्के ओबीसी आणि मायक्रो ओबीसी समाजाचा लागला आहे”, असा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केला.