लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 400 पारचा नारा दिला. परंतु एनडीएला 300 पार करता आले नाही. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक फटका महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अन् पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बसला. महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर विचारमंथन राज्यातील भाजप नेत्यांनी सुरु केले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रणनीती तयार केली जात आहे. त्यासाठी आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिन्हीपक्षाचे एकमत आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करुन आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे. मत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि तारीख पुढच्या आठवड्यात ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रीन सिग्नल मिळाले आहे. या विस्तारात ७-५-२ असा फॉर्मुला ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. विस्तारात शिवसेना शिंदे गटातील रिक्त मंत्रीपद शिंदेंकडेच राहणार आहे. संदीपान भुमरेंचा जागी संजय शिरसाट यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदाराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलली आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर संघाकडून भाजपला सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावले जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय काढला. त्यानंतर अजित पवार यांनी सोबत घेतल्यासंदर्भात संघाकडून प्रश्न उपस्थित झाला. तसेच अंहकारी पक्षाला 241 जागांवर रोखले, असे वक्तव्य संघाकडून झाले होते. त्यासंदर्भात विरोधकही आता भाजपला घेरत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची कार्यशाळा संघाकडून घेण्यात येणार आहे.
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची चर्चा आहे. हा विस्तार करताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येणार आहे. भाजपमधून संधी देताना संघाचा सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहे. आता शेवटच्या टप्प्यात तरी मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.