रत्नागिरी : कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची नेहमी गर्दी असते. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना पर्यटक सध्या समुद्राच्या पाण्यात मौज मज्जेचा आनंद घेत आहेत. यामुळे गणपतीपुळे येथील समुद्रकिनार पर्यटकांनी गजबजल्याचे चित्र आहे. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि हिरवाईने नटलेल्या कोकणामुळे पर्यटकांचा ओढा गणपतीपुळे येथे असतो. देशभरातून पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर येतात अन् पर्यटनाचा आनंद लुटतात. परंतु सध्या गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. हे पाणी चौपाटीवरील दुकानांत शिरले आहे. चक्रीवादळामुळे हा बदल झाला आहे.
का वाढली समुद्राच्या पाण्याची पातळी
रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी पाण्याची पातळी वाढली आहे. समुद्राचे पाणी अचानक किनाऱ्यापर्यंत आले आहे. हे पाणी अगदी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहचले आहे. यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पर्यटकांचे सामान देखील वाहून गेले आहे. बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आले आहे.
काय आहे बिपोरजॉय
अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेल्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे समुद्रात अनेक बदल होत आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नाही. परंतु यामुळे समुद्रात अंतरप्रवाह बदलले आहे. यामुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यापर्यंत आले आहे. १२ जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात अत्यंत तीव्र चक्रीवादळाची परिस्थिती राहणार असल्याचे दिसत आहे.
‘बिपोरजॉय’मुळे मान्सूला उशीर
‘बिपोरजॉय’ या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. यामुळे ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये आला, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता केरळ, लक्षद्वीप, किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशता पुढील काही दिवसांत पाऊस पडणार आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. हा मान्सून राज्यात आधी कोकणात येतो. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला आहे. कोकणात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत.