मुंबईः विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी सोनिया, राहुल यांच्यासह शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका करत सवालाच्या फैरी झाडल्या होत्या. या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुलने अभिवादनाचे साधे ट्विट केले नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केले नाही. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून ट्विट करून दाखवा. तरीही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला.
फडणवीसांना काय दिले उत्तर?
खासदार संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालच्या तीनजणांनी पद्म पुरस्कार नाकारला आहे. कदाचित पुरस्कार देताना त्यांना विचारले गेले नसावे. हल्ली उठसूट कुणालाही हे पुरस्कार दिले जातात. काहींना मरणोत्तर पुरस्कार दिले आहेत. ते हयात असताना त्यांची किंमत का केली जात नाही, हे पायंडे थांबायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार हे आधीच ठरले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त गांधी कुटंबियांनी ट्विट केले नाही याचे फडणवीसांना फार वाईट वाटले आहे. मग तुमच्या केंद्रातील सरकारला त्यांना आज एखादा पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही, याचा त्यांनी खुलासा केला तर आम्हाला प्रतिक्रिया देणं सोप जाईल, अशा भाषेत त्यांनी फडणवीसांना उत्तर दिले.
विरोधीपक्ष कोत्या वृत्तीचा
खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षात नामर्दानगी आहे. सध्याचा विरोधीपक्ष कोत्या वृत्तीचा आहे. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या मानसिकतेची होती हे वेगळे सांगायला नको. विरोधी पक्षाची ‘उघडा डोळे बघा नीट’ अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अनेकांनी नामर्दपणानं टीका केली. या नामर्दपणाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. ते आता ज्या पद्धतीनं लोक कार्यक्रमात सहभागी होऊ लागलेत, त्यातून सारे उत्तर मिळाले आहे. एका आजारी व्यक्तीबद्दल बोलताना विरोधकांच्या मनातील कचरा समोर आलाय, अशा शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना