मुंबईः राणा (Rana) दाम्पत्याने अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गप्प का, असा सवाल बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. राऊत म्हणाले, त्यातला एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य जे अचानक राम आणि हनुमान भक्त झाले. त्यात ते इतके डुबले की, मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले. मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. 92 च्या दंगलीत अंडरवर्ल्ड कनेक्शन, पाकिस्तान कनेक्शन, डी गँग कनेक्शन असणाऱ्या अनेक माफिया टोळ्या होत्या. मला आता दिसते आहे, सरकारला दिसते आहे, हे जे 15 दिवसात घडते आहे, त्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण यामागे डी गँग आणि त्यांचा पैसा काम करतो, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
लकडावाला फायनान्सर
राऊत म्हणाले, लकडावाला मुख्य फायनान्सर आहे. त्याचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत याचे लहानसे प्रकरण समोर आले आहे. त्याची चौकशी का झाली नाही, जर लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला. त्यातले एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. त्यांनी 80 लाख रुपये घेतले. का घेतले, कशासाठी घेतले, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार डी गॅंगशी संबंधित डॉनच्या पैशाचा वापर कुठे झाला. एवढेच पैसे आहेत की अजून आहेत. याचा तपास मुंबईच्या ईओडब्ल्यूने का केला नाही. कारण हा लकडावाला ईओडब्ल्यूच्या कस्टडीत होता. तो ईडीच्या कस्टडीत होता. मनी लॉन्ड्रिंगची ही फिट केस आहे, असा दावाही त्यांनी केला.
फक्त राणांना का सोडले?
राऊत म्हणाले, मग नवनीत राणा या सगळ्यातून कशा सुटू शकतात. त्यांना वाचवणारी कोणती आंतरराष्ट्रीय शक्ती आहे. त्यांच्या माध्यमातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे अनेक प्रकरण आली. ती कालच मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. ते योग्य ठिकाणी देतील. ईओने आधी चौकशी का केली नाही. त्यात कुणाचे हस्तक होते की, त्यांनी राणांना चौकशीला बोलावले का नाही, माझा सवाल ईडीला आहे. 5 लाख, 20 लाखासाठी मंत्र्यांना तुरुंगात टाकता. मालमत्तेवर टाच आणता. लकडावाला तुमच्या कस्टडीत होता. सर्वांना चौकशीला बोलावले. मग फक्त राणांना का सोडले. मी ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे.
राऊत म्हणाले, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. देश तोडणारे अस्थिरता निर्माण करणारे यांच्या बाजूने कोणी राहू नये. फडणवीस तुम्ही गप्प बसला आहात. पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ शेअर केला. त्यावर फडणवीस काही बोलले नाहीत. इतर विषयावर भाजपचे लोक पोपटासारखे बोलतात ना. इतरांच्या बाबतीत आव्हानाची भाषा वापरता. मग याप्रकरणावर का बोलत नाही. आधीच्या आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार झाले. ते चालते का, ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कायदेशीर कारवाई केली, तर त्यांच्यावर शिक्का मारता. राजेश्वरसिंग भाजपमध्ये आला. त्याबाबत त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवालही त्यांनी केला.