प्रत्येक रुग्ण हसतखेळत घरी गेला पाहिजे, रुग्णसेवेत तडजोड नकोच; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याची तंबी

| Updated on: Apr 09, 2021 | 9:07 PM

रुग्णालय असो की कोविड सेंटरमधील प्रत्येक रुग्णांची काळजी घ्या. (ravindra binwade visit corona centers in jalna district)

प्रत्येक रुग्ण हसतखेळत घरी गेला पाहिजे, रुग्णसेवेत तडजोड नकोच; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याची तंबी
ravindra binwade
Follow us on

जालना: रुग्णालय असो की कोविड सेंटरमधील प्रत्येक रुग्णांची काळजी घ्या. प्रत्येक रुग्ण उपचारानंतर हसतखेळत घरी गेला पाहिजे. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, त्यात कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे. (ravindra binwade visit corona centers in jalna district)

रवींद्र बिनवडे यांनी आज भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटर तसेच जाफ्राबाद येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशीही संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी उप विभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसिलदार संतोष गोरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदेल, डॉ. मोतिपवळे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा नागरिक या गोष्टी अंगावर काढत असल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यापेक्षा त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा, जेणेकरुन त्यांच्यावर वेळेत व चांगल्या पद्धतीने उपचार होतील. तसेच भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना देतानाच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशारा बिनवडे यांनी दिला. यावेळी बिनवडे यांनी याच ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाची पाहणी केली.

आरोग्य तपासणी होते काय?

यावेळी त्यांनी भोकरदन येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तुम्हाला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येतात का?, जेवणाचा दर्जा चांगला आहे का?, वेळेवर आरोग्य तपासणी केली जाते काय? आदी बाबींची त्यांनी रुग्णांकडे अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

गावकऱ्यांना लस टोचून घेण्याचं आवाहन करा

त्यानंतर त्यांनी जाफ्राबाद येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली. यावेळी लसीकरण केंद्रास भेट देऊन लस घेणाऱ्या लाभार्थ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित असून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घेण्याबरोबरच आपल्या गावातील प्रत्येकाला लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्रिसूत्रीचं पालन करा

कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी यावेळी उप विभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसिलदार संतोष सोनी, डॉ. सोनटक्के, मुख्याधिकारी दुधनाळे, पोलिस निरीक्षक जायभाये आदी उपस्थित होते. (ravindra binwade visit corona centers in jalna district)

 

संबंधित बातम्या:

जालन्यात कोरोना रोखण्यासाठी पाचसूत्री कार्यक्रम; आरोग्य मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

जालन्यात दर पंधरा दिवसांनी कामगारांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लॉकडाऊन रद्द केल्यानंतरचा जल्लोष भोवला, खासदार इम्जियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल

(ravindra binwade visit corona centers in jalna district)