विनायक डावरुंग, मुंबई : देशातील भाजपचे सर्व नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात सूडातून कारवाई केली. त्यांनी देशाची माफी मागण्यासाठी भाजप (BJP) आंदोलन करत आहे. मात्र राहुल गांधी कधीही माफी मागणार नाहीत. माफी मागणं त्यांच्या रक्तातच नाही. माफी मागायला त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. आता या हुकुमशाही विरोधात देश रस्त्यावर उतरले, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर विक्रमी मतांनी विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कसब्याची निवडणूक आणि विजयी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची चर्चा झाली. राहुल गांधी यांच्यावर काल झालेल्या कारवाईवरून रवींद्र धंगेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
शुक्रवारी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. यावरून महाराष्ट्र काँग्रेसकडून सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ राहुल गांधी माफी मागू शकत नाहीत त्यांच्या रक्तात ते नाही. त्यांनी काही चुकीचे केले नाही माफी मागायला. गेली सात वर्ष भाजपने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय यंत्रणेत भाजपचा हस्तक्षेप पहायला मिळतोय. पंतप्रधान व इतर भाजप नेते हे लोकशाही ही हुकुमशाहीकडे नेहताना पहायला मिळते. लोकशाहीचे जे जे स्तंभ आहेत. त्याच्यावर दबाव आहे. त्या चारही स्तंभाला पकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, मात्र याविरोधात आता जनता रस्त्यावर उतरणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘ भाजपची परिस्थिती उलटा चोर कोतवाल को दाटे अशी आहे. obc ला पुढे करून असफल प्रयत्न भाजप करत आहे. देशाचे पंतप्रधान स्वतःला obc म्हणत आहेत. लोकांना साथ देणारा कोण आहे हे कळतं, राहुल गांधी जनतेचा आवाज बनले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते लढत आहेत. – काल लोकशाहीचा खून करण्याचं काम भाजप सरकारने केलंय. जे पाप करायचं होत ते केलं पण लोक आता रस्त्यावर उतरतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय.