नाशिक, देवास : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बँकेने या नोटा चलनातून माघारी घेण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. 30 एप्रिल 2023 पर्यंत 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्यामुळे त्याची भरपाई करावी लागणार आहे.
नोटा अधिक छापाव्या लागणार
दोन हजाराची नोट माघारी घेतल्यानंतर नोटांची चणचण भासू नये म्हणून अधिक छपाई करावी लागणार आहे. नोटाची छापाई होणारी नाशिकरोड आणि देवास येथील नोट प्रेसला जादा छपाईचे उद्दीष्ट दिले आहे. नाशिक रोडला तीन महिन्यांत पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छपाईचे उद्दिष्ट दिले आहे. देवास येथील नोट प्रेसमध्ये रोज 2.20 कोटी नोट छापण्याचे लक्ष दिले आहे. सध्या या प्रेसमध्ये 500 रुपयांबरोबर 200, 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा छापल्या जात आहेत. त्या नोटींची छापाई सुरु राहणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
नोट बंदीमुळे छापाईचे उद्दीष्ट वाढवले गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द केल्या आहेत. देवासमध्ये कर्मचाऱ्याचे कामाचे तास 22 केले गेले आहे. कर्मचारी 11-11 तासांच्या शिफ्टमध्ये काम करणार आहे. यापूर्वी कर्मचारी नऊ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत होते. म्हणजे त्यात दोन तास वाढवण्यात आले आहे. देवास येथील नोटप्रेसमध्ये 1,100 कर्मचारी कार्यरत आहे. नाशिकमधील प्रेसमध्ये एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटांची छपाई झाली आहे.
वन लाइन मशीन
देवासमध्ये वर्षभरापूर्वी वन लाइन मशीन बसवण्यात आली होती. RBI ने वर्षभरापूर्वी 2000 च्या नोटा बंद करण्याची योजना आखली होती. त्यामुळेच देवास बँक नोट प्रेसमध्ये 1.25 पट नोटा छापण्याचे काम सुरू होते. बाजारात नोटांचा तुटवडा भासू नये म्हणून नवीन मशीनमुळे दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी नऊ तास नोटा छापण्याचे काम होत होते.
किती नोटा चलनात
31 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.