भारतीय उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. TATA उद्योग समूहाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून देण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. रतन टाटा यांच्या निधनानंतर भारतीय उद्योग विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रतन टाटा हे भारताचे किर्तीवंत, दयाळू ह्दयाचे सुपूत्र होते, असं म्हटलं आहे. भारतासाठी आणि भारताच्या उद्योग विश्वासाठी हा दु:खद दिवस आहे असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. रतन टाटा यांचं जाणं ही फक्त टाटा समूहाची नाही, तर प्रत्येक भारतीयाची हानी आहे असं मुकेश अंबानी यांनी आपल्या शोक संदेशात म्हणाले आहेत. ‘रतन तुम्ही नेहमीच माझ्या ह्दयात रहाल’ असही मुकेश अंबानी म्हणाले.
“व्यक्तीगत पातळीवर रतन टाटा यांचं निधन हे माझ्यासाठी खूप दु:खद आहे. मी माझा जवळचा मित्र गमावला. जेव्हा-जेव्हा माझी रतन टाटा यांच्याशी भेट झाली, तेव्हा-तेव्हा मला त्यांच्यापासून प्रेरणा, ऊर्जा मिळाली. प्रत्येक भेटीनंतर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर वाढत गेला. ते एक उत्तम मानवी मुल्य जपणारे व्यक्ती होते” असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.
अजून मुकेश अंबानी काय म्हणाले?
“रतन टाटा हे परोपकारी स्वभावाचे, दूरदृष्टी असलेले उद्योजक होते. त्यांनी नेहमीच समाजाच्या भल्यासाठी कार्य केलं” अशा शब्दात मुकेश अंबानी यांनी रतन टाटांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “रतन टाटा हे भारताचे किर्तीवंत, दयाळू ह्दयाचे सुपूत्र होते. रतन टाटा यांनी जगात भारताची ख्याती, किर्ती वाढवली तसच जगात जे सर्वोत्तम होतं, ते भारतात आणलं. 1991 साली टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्यभारत संभाळल्यानंतर त्यांच्या काळात 70 पट समूहाची प्रगती झाली” असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. 1991 पासून रतन टाटा यांनी टाटा सन्सच नेतृत्व संभाळलं. आपले काका JRD टाटा यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला.