मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, अदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने थेट सत्तेत सामील होणारे अजित पवार हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत.
राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. अशावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्यात भाजप आणि शिवसेना युती सरकारचे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय विखे पाटील यांच्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये सामील झाले.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदाच थेट विरोधी पक्षनेते यांना आपल्या गटात खेचले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सत्तेत सामील झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.