मुंबई (सुनील ढगे) : “सुनील प्रभू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो, असं त्यांनी साक्षीमध्ये सांगितलं. पण बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख सुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांचे बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे चाललेल आहे. दुरुस्ती व्हावी, विधानसभेच अधिवेशन आहे. त्यातही आम्ही चर्चा करू, अधिकार असतात. मात्र, ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही, आम्ही जाब विचारू” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED ने संपत्ती जप्त केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “चिडलेल्या भाजपचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये त्यांची हार झालेली आहे”
“पंतप्रधानांच्या सभेला लोक जमा होत नाहीत. गृहमंत्री यांच्या सभेला जमा होत नाहीत. त्यांच्यासमोर सगळीकडे हार निश्चित ठरलेली आहे, अशावेळी सूड उगवत ही कारवाई त्यांनी केलेली आहे” असं नाना पटोले म्हणाले. “मागच्या काळातही खूप त्रास दिला. गांधी घराण्याची ही काही प्रॉपर्टी नाही. ही देशाची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमध्ये काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे हे गांधी परिवाराचे पैसे नाहीत. प्रत्येकाने आपल्या कामाचा पैसा त्या ठिकाणी लावलेला आहे, तर ते आज ना उद्या खरं समोर येणार. पायाखालची जमीन सरकलीय. त्यामुळे भाजपने ही कारवाई केलीय” असं नाना पटोले म्हणाले.
‘मराठा विरुद्ध ओबीसी हे पेटवण्याच काम’
“आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी संविधानात लिहिलेला आहे. जनगणना करत नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत, मूळ हा धर्माचा प्रश्न नाही होऊ शकत, हा धर्माचा प्रश्न नाही, होऊ शकत नाही, करायला विरोध का करता. या मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत, त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिलं पाहिजे” असं नाना पटोले म्हणाले. “मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे, राज्यातील एक मंत्री एका समूहाबरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आलं पाहिजे की, हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम सुरू आहे” असा दावा नाना पटोले यांनी केला.
‘चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू’
“संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावं किंवा जाऊ नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू आहे” असं नाना पटोले यांनी सांगितलं.