विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली. तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. या निवडणुकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी झाले आहेत, अशी घोषणा विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी केली.
पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले, असं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.
निरंजन डावखरे यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “मी तिसऱ्यांदा त्याच मतदारसंघातून निवडून आलो आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. कर्मचारी आणि पदवीधरांनी माझ्यावर विश्वास पुन्हा दाखवला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवेन. प्रचार करताना कोणी कितीही जोर लावला तरी निकाल आता स्पष्ट आहे. यामध्ये मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाला त्यांचे देखील आभार मानतो. तिसऱ्यांदा निवडून आलो असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच मी काम करेन”, अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली.