डोंबिवलीः सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी. आता कल्याण-डोंबिवलीमध्ये रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन विभागाने नवीन दरपत्रक जाहीर केले असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीकरांचे वाद लक्षात घेऊन ही भाडेवाढ करण्यात आली आहे. परिवहन विभागाने यावर प्रवाशांकडून हरकती मागवल्या होत्या. मात्र, तीन ते चार जण वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरवली.
का केली भाडेवाढ?
कल्याण-डोंबिवलीत केलेली रिक्षा भाडेवाढ ही सुट्ट्या पैशांच्या वादामुळे करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यासाठी 8 रुपये शेअर भाडे आकारले जायचे. मात्र, रिक्षाचालक सुट्टे पैसे नसल्याचे सांगत प्रवाशांकडून 10 रुपये घ्यायचे. आता या भाड्यात 1 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा वाद राहणारच आहे. यापूर्वी प्रमाणेच आताही रिक्षाचालक सरसकट दहा रुपयेच घेतील. त्यामुळे तक्रार कायम राहणार आहे.
पाच-पाच प्रवाशांची वाहतूक
कल्याण-डोंबिवलीतील काही थांब्याववरून रिक्षाचालक हे चक्क चार ते पाच प्रवाशांची वाहतूक करतात. त्यांच्याकडून खरे तर शेअर भाडे आकारणे अपेक्षित आहे. मात्र, दुप्पट भाडे वसूल केले जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. त्यावर तोडगा म्हणून आता आरटीओने नवीन दरपत्रक जाहीर केले. त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या. मात्र, फक्त तीन-चार प्रवासी वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा प्रश्नही असा चुटकीसरशी सुटण्याची शक्यता नाही.
अन्यथा कारवाई होणार
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा व्यवहारही बंद होता. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. कोणाचे घरभाडे थकले, तर कोणाचा ईएमआय. हेच पाहता पोलिसांनी थोडी सूट दिला. रिक्षा वाहतूक सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाई केली नाही. मात्र, आता अतिरिक्त भाडे वसूल केले किंवा बेशिस्त वागणूक केली, तर रिक्षाचालकांवर कारवाई करू, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.
नियम पालनाचे आवाहन
सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूची सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी स्वतः कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क वापरावा. प्रवाशांनाही मास्क घालण्यास सांगावे. प्रवाशांनी मास्क घातला नसेल, तर रिक्षाचालकांवर कारवाई करू, अशा इशारा देण्यात आला आहे.
Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!
नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द