मुंबईः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वामी ढुमणे (Swati Dhumne) यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत रुजू करून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत श्रीमती ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना प्रकट केली. तसेच वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच स्वाती ढुमणे यांच्या चार वर्षाच्या मुलीसाठी राज्य सरकार तथा विविध संस्थांच्या वतीने आर्थिक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ताडोबा फाऊंडेशनकडून पाच लाखांचा धनादेश व ताडोबा संवर्धन प्रतिष्ठानकडून 50 हजारांची मदत देण्यात आली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाअंतर्गत प्राण्यांच्या पाऊलखुणा नोंदवण्याच्या कार्यक्रमाला शनिवारी सुरुवात झाली. मात्र या शुभारंभाच्या दिवशीच महिला वनरक्षकावर हल्ला करून वाघिणीने त्यांना जागीच ठार केले. ही घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक 97 मध्ये घडली. शनिवारी सकाळी सात वाजता सहकाऱ्यांसह कोलारा गेटपासून 4 किमीपर्यंत पायी चालत गेल्यावर त्यांना 200 मीटर अंतरावर एक वाघीण बसलेली दिसली. त्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली आणि घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला. या घटनेत स्वाती यांचा मृत्यू झाला.
इतर बातम्या-