‘…तर स्वत:ची लाज वाटेल’, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा

| Updated on: Feb 03, 2021 | 11:21 PM

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर चांगलाच गदारोळ माजला आहे (Rupali Chakankar slams Kangana Ranaut).

...तर स्वत:ची लाज वाटेल, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा
Follow us on

वर्धा : जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर चांगलाच गदारोळ माजला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने तर रिहानाला प्रत्युत्तर देताना आंदोलक शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलं आहे. कंगनाच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी कंगणावर निशाणा साधला आहे (Rupali Chakankar slams Kangana Ranaut).

“रिहानाचं ट्विट येताच भाजपच्या काही चमच्यांच्या प्रचंड पोटात दुखतंय. कंगणाने याबाबत ट्विट करत हे शेतकरी दहशतवादी आहे, असं म्हटलंय. मला या अशा लोकांना विचारायचं आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे याचे पुरावे आहेत काय? पुरावे असतील तर ते सादर करा. किमान आपण ज्या देशात राहतो, ज्या देशाचं अन्न खातो, ते अन्न या अन्नदात्याने पिकवलं आहे. या शेतकऱ्याने पिकवलं आहे. याचं भान ठेवलं तर आपल्याला स्वतःला आपली लाज वाटेल”, अशा शब्दात चाकणकर यांनी टीका केली आहे (Rupali Chakankar slams Kangana Ranaut).

“रिहाना यांना या देशाच्या शेतकऱ्यांची काळजी वाटते. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळेस कंगना अशा पद्धतीने ट्विट करत दहशतवादी ठरवते. तिची ही संकुचित वृत्ती अत्यंत किळसवाणी आहे. भाजप विरोधी बोललेलं प्रत्येक वाक्य तिला दहशतवादी का वाटते? हेच काही समजत नाही. अशा पद्धतीचा वक्तव्य करत असताना खरा दहशतवादी कोण आहे? याचा अभ्यास कंगणाने करावा”, अशा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला.

रिहाना काय म्हणाली होती?

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने म्हटलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.

रिहानाच्या ट्विटला विदेश मंत्रालयाचं उत्तर

रिहानाच्या ट्विटला देशाच्या विदेश मंत्रालयाने उत्तर दिलं. याप्रकरणी कोणतंही ट्विट करण्याआधी नेमकं तथ्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी आम्ही आग्रह करतो. भारतीय संसदेत कृषी कायद्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच कृषी कायद्यांना मान्यता देण्यात आली आहे, असं विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

अभिनेत्री कंगना रणौतने रिहानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’, असं कंगनाने म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?