अमोल मिटकरी यांच्या राज ठाकरेंबद्दलच्या एका वक्तव्यानं, वाद गाडी फोडण्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. पण राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानं मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंनी पुन्हा इशारा दिलाय. दिसला की तुडवणार, असं दुनबळे म्हणाले आहेत. अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर, पुढच्या काही तासांत आरोपी जय मालोकारचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. मात्र तरीही मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे आणि मिटकरींमधली शाब्दिक चकमक, कुत्र्या सारखं मारण्यापर्यंत पोहोचली आहे.
राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली. मात्र हल्ल्यासाठी चिथावणी देणारा मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हणणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना तुडवलं नाही, तर पदमुक्त करणार असा इशाराच कर्णबाळा यांनी दिला आणि त्यानंतर अकोल्याच्या विश्रामगृहाबाहेर मिटकरींच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यात कर्णबाळा दुनबळे हे मुख्य आरोपी आहेत. तर हल्ल्यावेळी उपस्थित असलेला जय मालोकर हा सहआरोपी होता. त्यामुळं हल्ल्यासाठी चिथावणी देणारे कर्णबाळा दुनबळेच मालोकारच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.
अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यावेळी ते अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात होते. मात्र बाहेर येण्याचा इशारा मनसेचे कार्यकर्ते देत होते. पण पोलिसांनी दार लावून घेतलं आता पुन्हा मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा यांनी गाठ कर्णाशी आहे, असा इशारा मिटकरींना दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते जय मालोकरचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे जय मालोकरच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अमोल मिटकरी पुण्यात आल्यावर मारू. असा इशारा दिला आहे. तुमच्या बापाचं राज्य नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. हा गुन्हेगारीचा आखाडा नाही. राजकारणात विकासाबद्दल बोलायला पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांना कळालं पाहिजे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको. तुमची मर्दानगी तुमच्या घरी दाखवा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरावी. आंदोलन जनतेच्या विकासासाठी करा, जनतेच्या कामासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावा. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केली आहे.