मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुढचे दोन दिवस अख्खं राज्य मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. यावर या बैठकीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव, दुष्काळ बाजूला राहिला, सरकारच्या राजेशाही थाटाचंच दर्शन मराठवाड्याला दर्शन होईल. मराठवाड्यात मुख्यमंत्री येतील. झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल, असं म्हणत सामनातून आजच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीवर निशाणा साधण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरात आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी लाखो रुपये खर्च करून शहरातील एकूण एक सारी महागडी हॉटेल्स सरकारकडून बुक करण्यात आली. अशा पंचतारांकित वातावरणात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून ही बैठक पार पडेल.
म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीसाठी नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे आणि बाता मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर वगैरे मारण्याच्या असल्या तरी बैठकीचा सगळा थाटमाट राजेशाहीच आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आणि दुष्काळ राहिला बाजूला, राज्य सरकारने आपल्या राजेशाही थाटाचेच दर्शन मराठवाड्याला घडवले. आज मराठवाड्यात मुख्यमंत्री येतील व झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल.
मराठवाडय़ात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कॅबिनेट बैठकीआधी राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवून घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारला तीस दिवसांची मुदत दिली असून उपोषण सुटले असले तरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे-पाटलांनी घेतली. उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावे अशी उपोषणकर्त्या नेत्यांची इच्छा होती, पण मुख्यमंत्री आले, दोन उपमुख्यमंत्री आले नाहीत. संभाजीनगरातील मंत्रिमंडळ बैठकीस कोणतेही अडथळे नकोत.
सरकारी वाहनांवर, मंत्र्यांवर हल्ले वगैरे होऊ नयेत यासाठी सरकारने वेळ मारून नेली आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे. मंत्रिमंडळ बैठकीचे सोपस्कार पार पाडले जातात, पण हाती काहीच लागत नाही. आता मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व जाणून सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतली. अमृत महोत्सवाच्या एका सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा संभाजीनगरात अवतरणार होते, पण प्रशासनाने कार्यक्रमाची संपूर्ण आखणी केल्यावर अचानक अमित शहांनी मराठवाड्यात येणे टाळले आहे. मुख्यमंत्री मिंधे काय किंवा केंद्रीय गृहमंत्री शहा काय, शहरात येऊन त्यांनी लोकांच्या तोंडास पानेच पुसली असती.