उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची आज सांगलीत भेट झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची सांगलीत आज जाहीर सभा पार पाडली. सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या भेटीचा समोर आलेला व्हिडीओ पाहून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या कवलापूर विमानतळावर दाखल झाले तेव्हा सांगलीच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी कवलापूर विमानतळावर संभाजी भिडे हे देखील उपस्थित होते. ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची वाट पाहत होते. देवेंद्र फडणवीस कवलापूर विमानतळावर आपल्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडल्यानंतर संभाजी भिडे हे त्यांच्या भेटीसाठी पुढे आले. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी फडणवीसांचं स्वागत केलं. फडणवीसांनी त्यांचं स्वागत स्वीकारलं.
यावेळी संभाजी भिडे फडणवीसांच्या पुढे आले. त्यांनी फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितलं. यावेळी फडणवीसांनी मान हलवत त्यांच्या बातचितला होकार दिला. दरम्यान, संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण राजकीय वर्तुळात संभाजी भिडे यांनी फडणवीसांच्या कानात काय सांगिलतलं असेल? याबाबत चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी सांगलीत आपल्या भाषणात नागरिकांना संजय काका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “आमच्याकडेपण पैलवान आहेत. आपली विकासाची गाडी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. आपली विकासाची गाडी आहे. तिकडे डब्येचं नाहीत. लालूप्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी सांगतात मी इंजिन आहे, शरद पवार सांगतात मी इंजिन आहे. संजय काकांना तिसऱ्यांदा आपल्याला निवडून आणायचं आहे. सांगलीकरांना विकासाकडे ते घेवून चालले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये भारताला पंतप्रधान मोदींनी बदललं. देशातील 20 कोटी लोकांना घर मिळालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आम्ही मोदींच्या नेत्वृवात पाणी पोहोचवण्याचं काम केलं. वर्ल्ड बँकने तत्वता मान्यता सुद्धा दिलीय. पुराचं पाणी वाहून जातं. ते आमच्या कामी येईल. आज एक सुरक्षित भारत झालेला आहे. मोदीजींच्या नेत्वृवात एक भारत तयार झालाय. दिल्लीची निवडणुक आहे. गल्लीची निवडणूक नाही. सांगली पर्यंत विकासाची गंगा आणण्याची ताकद मोदींमध्ये आणि संजय काकांमध्ये आहे. अख्यी सांगली संजय काकांच्या पाठीशी आहे. भाषणांनी विकास होत नाही. संजय काकांच्या पाठीशी उभं राहा. संजय काकांचं बटण दाबलं की मत मोदीजींना मिळेल. अन्य कोणाचं बटण दाबलं तर मत राहुल गांधीना मिळेल”, असंही फडणवीस म्हणाले.