आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं असताना आता सचिन वाझे याने नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. याआधी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत लेटरबॉम्ब टाकला होता. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राज्याच्या तत्कालीन पोलीस महासंचालकांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा धक्कादायक आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर आता निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या लेटरबॉम्बची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्याने जेलमधून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
निलंबित एपीआय सचिन वाझे याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं पत्र ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलं आहे. सचिन वाझे याच्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं सचिन वाझे पत्रात म्हणाला आहे.