कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे पवार आणि चपळगावकर यांचे नाशिक येथे आगमन झाले असून, दिवसभरही भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
परिसंवाद : सकाळी ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’ या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.
नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद
नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.संमेलनाचा समारोप रविवार, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होईल. समारोपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बालकुमार साहित्य मेळावा
साहित्य संमेलनात सकाळी नऊ वाजता बालुकमार साहित्य मेळावा होणार आहे. यात रेणू गावस्कर आणि अर्चना कुडतरकर उपस्थित राहणार आहेत. मुग्धा थोरात या मुलांच्या गप्पागोष्टी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास हा विशेष कार्यक्रम होणार आहे. खगोल ते भूगोल हा कार्यक्रमही होणार असून, त्यात राजीव तांबे, आनंद घैसास सहभागी होणार आहेत. कल्पनांमधील नावीन्यता व विज्ञान या कार्यक्रमात डॉ. सुनील कुटे सहभागी होणार आहेत. बालकुमार साहित्य मेळाव्याचा समारोप नितीन उपासनी, शिवांजली पोरजे, साक्षी पगारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य