मुंबई : Why I Kill Gandhi या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी विरोध केलाय. तर एक अभिनेता म्हणून नथूरामची भूमिका करण्यात काय गैर आहे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या सर्व गोंधळात अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका होत असून वेगवेगळे आरोप केले जात आहे. आता तर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे, असा आरोप करत; Why I Kill Gandhi या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
अमोल कोल्हे यांनी Why I Kill Gandhi या हिंदी चित्रपटात महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा अभिनय केला आहे. या चित्रपटात नथुरामचे उदात्तीकरण केले जात आहे, असा काही लोकांचा दावा आहे. याच कारणामुळे संभाजी ब्रिगेडने डॉ. अमोल कोल्हेंविरोधात कठोर भूमिका घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. “आम्हाला नथुराम नकोय. नथुरामप्रेमी डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा Why I Kill Gandhi हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये. त्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी. आम्हाला नथुराम नकोय,” असे रोखठोक वक्तव्य संतोष शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडतर्फे केले.
दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटामुळे वादंग माजलेले असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हे यांचे समर्थन केले आहे. कलाकाराकडे एक कलाकार म्हणून पाहिले पाहिजे, असं पवार यांनी म्हटलंय. “गांधीवरील सिनेमा अमेरिकेतून प्रदर्शित झाला. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली. ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे,” असे शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :
अमोल कोल्हेंनी विचारधारा बदली की ‘राष्ट्रवादी’ गोडसेचे समर्थन करते?; युवक काँग्रेसचा सवाल