दत्ता कानवटे, Tv9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध मराठा संघटना या आरक्षणासाठी आक्रमक झाल्या आहेत. मराठा आंदोलकांकडून नेतेमंडळींना काळे झेंडे दाखवण्याचे प्रकार आता घडायला लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी काही मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर काल मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांची पडताळणी करणारी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीला काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार धाराशिवमध्ये घडला. तर पुण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही काही मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. दानवे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलीय.
“मराठा आरक्षणाविषयी नुसतं मराठा समाजाची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची मानसिकता आक्रमक बनलेली आहे. किती वाट पाहायची, किती आश्वासन झेलायची, याचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. राज्याचे आणि देशाचे सत्ताधारी यांच्यावर अवलंबून आहेत. असं सर्व असताना खोटी आश्वासन दिले जातात. जरांगे पाटलांनी उपोषण केल्यावर 30 दिवसांची मुदत मागितली होती. 40 ते 42 दिवस झाले तरीही एकही पाऊल सरकारचं पुढे पडलं नाही. हे जनतेला कळलं पाहिजे, म्हणून मराठा समाजाची तीव्रता आहे. ती अजित पवार असो की अन्य कुणी असो यांनाही आक्रमकता झेलावीच लागेल”, असं अंबादास दानवे म्हणाले.
“मराठा समाजाच्या भावना असल्यामुळे मलाही विरोध झाला. मीही आंदोलन केले आहेत आणि करावे लागतात. त्यामुळे मला काही राग नाही. यात या भावना सगळ्यांच्याच आहेत. माझी सुद्धा तीच भावना आहे. पण भूमिका मांडणारे आवश्यक असतातच. शेवटी मी सुद्धा आरक्षणाच्या बाजूचा आहे आणि समाजाची भावना मनोज जरांगे मांडतायेत. पण वैधानिक पद्धतीने या भूमिका सर्वांना मांडाव्या लागतील असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
“आंदोलन आक्रमकतेच्या टोकावर आलंय. हे सत्य आहे. आंदोलन करताना नेत्यांवर दबाव आणल्यावर राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित सरकार निर्णय घेऊ शकतं. पण हे होत असताना शेवटी जे काय नेते असेतील तेही आपलेच आहेत. ही भूमिका आपण स्वीकारावी”, असं आवाहन अंबादास दानवे यांनी केलं.