औरंगाबाद पूर्वमध्ये मराठा कार्ड तर चालले नाही ना? अशी चर्चा आता दुसऱ्या फेरीपासून रंगली आहे. या ठिकाणचे कल भाजपाला धडकी भरवणारे आहेत. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या अतुल सावे यांना ईव्हीएम मतातून दे धक्का देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. अर्थात अजून चित्र स्पष्ट व्हायचे बाकी आहेत. पण सध्या इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसते. मुस्लिम, दलित आणि मराठा मतांची मोट बांधण्यात जलील यांना यश आल्याचे सध्या तरी दिसते. ताज्या आकडेवारीनुसार, 23,539 मतांसह जलील आघाडीवर आहेत. तर त्याखालोखाल सावे यांना मतं मिळाली आहेत.
औरंगाबाद पूर्वमध्ये 60 टक्क्यांहून अधिक मतदान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा होता. पण गेल्या काही वर्षांपासून भाजपाने या ठिकाणी मांड ठोकली आहे. अतुल सावे हे दोन टर्मपासून पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची महायुतीत कॅबिनेट पदी सुद्धा वर्णी लागली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यावेळी 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे सध्या टफ फाईट देताना दिसत आहेत. तर अतुल सावे लवकरच लीड घेण्याची शक्यता आहे.
सर्व फॅक्टरची विजयासाठी बांधली मोट
अतुल सावे यांनी हॅटट्रिक साधणार का, याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या विरोधात मराठा कार्ड चालणार असे बोलले जात आहे. त्यांची ओबीसी आंदोलकांना सुप्त सहानुभूती होती. तर मराठा आंदोलनाच्यावेळी ते फारसे दिसले नाही असा आरोप करण्यात येत होता. या मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची दोन-तीन वेळा भेट घेतली. त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व फॅक्टरची मोट बांधण्यात जलील यशस्वी होतात की सावे हे थोड्याच वेळात समोर येईल.
मुस्लिम मताधिक्य
यावेळी औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मुस्लिम मतांचा टक्का वाढलेला दिसतो. तर या मतदारसंघातील काही हिंदू बहुल भागात मतदानाचा टक्का कमी झाल्याचे दिसले. यावेळी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांची भाऊगर्दी दिसली. वंचित बहुजन आघाडीने वेळेवर उमेदवार बदलून अफसर खान यांना उमेदवारी दिली. एमआयएममधून बाहेर पडलेले डॉ. गफार कादरी हे समाजवादी पक्षाकडून या मैदानात उतरले आहेत. इतरही अनेक मुस्लिम उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम मतांची मोट कोण बांधणार ही चर्चा आहे.