भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ रावसाहेब दानवे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना पुष्पगुच्छ देत आहेत. यावेळी फोटो काढला जातोय. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे फोटोला पोज देत असताना त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारुन बाजूला करताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरुन अनेकांकडून दानवे यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक जण रावसाहेब दानवे यांना ट्रोल करत आहेत. या व्हिडीओवर आता दानवे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“काठी घेऊन लोक लोटले म्हणून मला आठवण केलं जातं. मात्र तो माझा स्वभाव आहे. मला मीटिंगसाठी मुंबईला लवकर जायचं होतं म्हणून मी कार्यकर्त्यांना सभेला लवकर चला असं सांगत होतो. त्यामुळे यात काही आश्चर्य नाही. मी पिंजऱ्यातला पोपट नसून जे पिंजरातील पोपट आहेत त्यांना हे पाहून आश्चर्य वाटतं. ट्रोल केल्यामुळे मी थांबणार नाही असे प्रसंग आणखी पुढे पाहायला मिळतील”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
“लाथ मारण्याचा माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मित्रा लाथ मारली नाही. तो माझा शेजारी मित्र आहे. माझा शर्ट जॅकेटमध्ये अडकल्यानंतर तो काढण्याचा प्रयत्न करत होता म्हणून त्याला बाजूला करण्यासाठी मी लोटलं. याला लाथ मारणं म्हणत नाहीत. लाथ कशी असते हे दाखवलं तर एका लाथेमध्ये कोणी उठणार नाही. आमचे लाथ मारायचे दिवस नाहीत. तोंडावरून हात फिरवण्याचे दिवस आहेत. आम्ही कुणाला लाथ मारू शकत नाहीत”, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं.
“लोकसभा निवडणुकीत आमच्या विरोधात एक निगेटिव्ह नेरेटिव्ह पसरविण्यात आलं होतं आणि त्यामुळे लोकसभेत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याच आधारावर आता शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष आपापलं नशीब आजमावत आहेत. त्यांना आता सरकार येण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे. दररोज सकाळी नऊ वाजता संजय राऊत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे म्हणतात. दुपारी एक वाजता जयंत पाटील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असे म्हणतात. तर विदर्भामध्ये नाना पाटोले काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा भ्रम त्यांना आहे. मात्र प्रत्यक्षात लोकसभेपेक्षा वेगळे वातावरण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे”, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.
“आमच्या सरकारने शेतीमध्ये गुंतवणूक आणि संसारात भागीदारी दाखवल्याने सर्वसामान्य लोकांना हे सरकार आपलं वाटतं. इंदिरा गांधी अकरा वर्ष देशाच्या पंतप्रधान होत्या. मात्र त्यांनी कधीही महिलांची चिंता केली नाही. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणल्या. त्यामुळे त्यांच्या सभेचा परिणाम फक्त मराठवाड्यातच नाही तर राज्यात होईल”, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.