छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिलं. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत आरोप केले आहेत.
“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला 1500 रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
“फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी), एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे”, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता.
“अरे भाऊ, आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो नाहीत तर आम्ही शासकीय विश्रामगृहात थांबलो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण थांबेल ते माहिती आहे ना? ते जे आलो होते ते धर्मशाळेत राहीले होते का? 100 रुम्स बुक केले होते ना, आम्ही कुठे थांबलोय याची आधी शाहनिशा तर करा”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्याला तिथे पत्रकार परिषदेत जाण्यास परवानगी मिळेल का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मिश्किल सवाल केला. “विकास राऊत नाही आलेत का? विकास राऊत, तुमच्या लोकमतचे”, अशी मिश्लिक टीका एकनाथ शिंदे यांनी केली.