छत्रपती संभाजी नगर : सरकारच्या शिष्टमंडळाने आज सकाळी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे होते. सरकारच्या शिष्टमंडळाने यावेळी जीआर म्हणजे अधिसूचना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. मुदतीच्या तारखेचा घोळा दूर करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे 24 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 जानेवारीची तारीख सांगत होते. तारखेचा हा घोळ दूर करण्यासाठी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. “तारखेच्या विषयात 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी यात फार फरक नाहीय. पाच-सहा दिवसांचा फरक आहे. त्याने काही जास्त फरक पडणार नाही. त्याच्या आतही सरकारच काम होऊ शकतं. समाज बांधवांना न्याय कसा देता येईल हे जास्त महत्त्वाच आहे” असं शिवसेना आमदार संदीपान भुमरे म्हणाले.
“आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली आहे. पण काल त्यांची तब्येत बिघडली होती” असं संदीपान भुमरे म्हणाले. जरांगे पाटील यांना मुंबईला उपचारासाठी घेऊन जाण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “डॉक्टर जे सांगितलं, ते ऐकाव लागेल. डॉक्टरांच्या पुढे जाता येणार नाही. मुंबईला चांगल्या सोयी-सुविधा आहेत. तिथे जायचं की नाही हे जरांगे पाटील यांच्यावर आहे”
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
सरकारचा जीआर अध्यादेश पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “जे आहे ते खरं बोला, आणखी पंधरा दिवस घ्या, पण खोटं बोलू नका. मी जातीतसाटी टोकाचा माणसू आहे” असं ते म्हणाले. “शिंदे समिती आधी एका विभागासाठी मराठवाड्यासाठी काम करत होती. एका भाऊ ऊपाशी राहणार, मग समाजाला न्याय कसा मिळणार?. जीआरमधून स्पष्ट झालय. समितीची कार्यकक्षा आता वाढवण्यात आलीय. थोडा वेळ घ्या, लेट द्या पण संपूर्ण महाराष्ट्राला द्या” या मागणीचा मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्चार केला. “सरकारने तातडीने पावलं उचलली, समितीची कार्यकक्षा वाढवली. मनुष्यबळ सुद्धा वाढवलं. शिंदे समिती, राज्य मागासवर्ग आयोग यावर काम करणार ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.