एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील हे आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. विधानसभा निवडणुकीचं मतदान उद्या पार पडणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे आणि त्या दृष्टीने ही भेट महत्वाची मनाली जाते. जलील यांनी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मी मनोज जरांगे पाटील यांना पहिल्यांदा भेटलो नाही. या अगोदरही भेटलेलो आहे. जरांगे पाटील हे प्रेरणा घेण्यासारखे व्यक्ती आहेत. निवडणुकीमध्ये कोणीही कोणाला भेटू शकते आणि मीही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. जरांगे पाटील यांना मोटार, बंगला, गाडी, मंत्रीपद काही नको. जरांगे पाटील यांनी समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभे केले आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे? महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मी राक्षसाचा वेश परिधान करुन भाजप आणि सरकारवर तुटून पडणार आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
“कालीचरण महाराजांनी जरांगे पाटील यांच्यावर केलेलं वक्तव्य निंदाजनक आहे. तुम्ही जरांगे पाटील यांना न्याय देत नाही आणि दुसरीकडे म्हणतात तुम्ही तो हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. तुम्ही जरांगे पाटील यांची मदत करू शकत नाही तर किमान त्यांच्या विरोधात तरी बोलू नका आणि कालीचरण महाराजांना हिंमत कुठून मिळत आहे ते आम्हाला माहित आहे. कालीचरण महाराजांना वाटते भारतीय जनता पार्टी आपल्यामागे आहे आणि आपण काहीही बोलू शकतो”, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “इम्तियाज जलील हे फक्त भेटायला आले होते. सध्या राजकीय वातावरण आहे. त्याच्यामुळे नेतेमंडळी येतात, जातात. आम्ही कुणालाच अडवत नाहीत. माझ्या कुणालाही शुभेच्छा नाहीत असे म्हटले तर त्याचा गैरअर्थ होईल. आमच्या कुणालाही पाठिंबा नाही हे अंतिम सत्य आहे. आमचा पाठिंबा राज्यात कुठेही नाही. मोडतोड करून व्हिडिओ पाठवू नये”, असा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी विरार येथील भाजप नेते विनोद तावडे यांच्यावरील आरोपांच्या प्रकरणावर प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “मी तर ते काही बघितलं नाही आणि मी काही बोललो की लगेच त्यांना मिरच्या लागतात. त्यांच्या त्यांच्यात काही डाव असू शकतो, नाकारता येण्यासारखे नाही. ते डाव टाकायला डेंजर आहेत”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.