राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष तयारी लागलेले आहेत. निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता सुरू झाली. आता अनेक ठिकाणी श्रेयवादासाठीच्या पाट्या, नामफलक कपड्यात गुंडाळण्यात आलेले आहे. कागद लावून ती झाकण्यात येत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरील नामफलक अंधारात गडप झाले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा घोळ झाला आहे. येथील महापालिकेच्या बोधचिन्हातच कमळाचे फूल आहे. त्यामुळे आचारसंहितेकडे बोट दाखवत, कोणी कुणाला फूल बनवू नये, असा पवित्रा उद्धव ठाकरे गटाने घेतला आहे. महापालिकेच्या बोधचिन्हात कमळाचे फूल आहे, त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार ठाकरे सेनेने केली आहे.
निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या बोध चिन्हातून कमळाचे फूल हटवण्याची मागणी उद्धव सेनेने केली आहे. ठाकरे गटाने कमळाचे फुलावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या बोधचिन्हातील कमळाच्या फुलांमुळे आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे. निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने तक्रार केली आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून मनपाच्या बोधचिन्हात कमळ आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गटाचे भाजपशी वाजले आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत लागलीच दिसला आहे.
हा तर सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न
राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असतांना महानगरपालिकेच्या बोधचिन्हात ‘कमळ’ हे चिन्ह भाजपच्या चिन्हांच्या रंगसंगतीत ठळकपणे दर्शीविलेले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपचा प्रचार होत आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध कार्यालयात ठिकठिकाणी भाजपच्या चिन्हाशी साधर्म्य साधणारे चिन्ह लावले आहे. हा एक प्रकारे भाजपचा प्रचार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे उप शहर प्रमुख अमित घनघाव यांनी बोधचिन्हातून कमळ हटवण्याची मागणी केली आहे. या नव्या मागणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.