संभाजीनगर | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात वेगळा निर्णय घेतला. ते विरोधी पक्षनेतेपदाच्या बाकावर बसले होते. पण त्यांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांनी थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगातही याचिका दाखल केली. त्यामुळे शरद पवार पक्षात एकटे पडले की काय, अशी परिस्थिती बघायला मिळाली. पण पक्षाच्या काही नेत्यांनी शरद पवार यांच्याबाजूने राहणं योग्य मानलं.
शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत भाजपचा विरोध केला. त्यांनी आजही सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात एक पर्याय उभा राहावा यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीत ते स्वत: ज्येष्ठ नेते म्हणून सहभागी आहेत. पण अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे शरद पवार यांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वैयक्तिक खूप नुकसान होतंय. याशिवाय कार्यकर्तेही संभ्रमात आहे. असं असलं तरी शरद पवार अजित पवार यांच्यावर नाराज आहेत की नाही? हे समजायला मार्ग नाही.
शरद पवार यांची तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत बैठक घडून आली. पुण्यात एका नामांकित उद्योगपतीच्या बंगल्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक घडून आली. या बैठकीची बातमी फुटली त्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी या बंगल्यासमोर जावून पोहोचले. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कौटुंबिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांनी याबाबत आणखी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. कुटुंबात मी कधीही राजकारण आणत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलंय. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये इतकं सारं घडूनही शरद पवार अजित पवार यांच्या मुलांच्या लग्नाच्या कार्यक्रमाला सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थात तो त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक अधिकार आहे. पण कौटुंबिक संबंध आणि राजकीय संबंध यांच्यातील विसंगती दोन्ही गोष्टींना कशा तारुण नेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवार यांच्या घरात दोन मुलं आहेत. त्यांचे लग्न व्हायचं आहे. अर्थात त्याला अजून वेळ आहे. पण त्यावेळी कुटुंबप्रमुख म्हणून जावे लागेल, असं शरद पवार म्हणाले. “भेट झाली नाही, असं नाही. मला भेटायला आले. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी कुठलाही कुटुंबिक प्रश्न असेल तर…, म्हणजे माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे, माझा एक सल्ला घ्यायचा. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर दिली.