अजित पवार गटात भूकंप, बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं काहीतरी घडतंय?

| Updated on: Jul 27, 2024 | 9:58 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप यावा अशी घटना घडताना दिसत आहेत. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जात शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश आता जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे बाबाजानी दुर्राणी यांनी स्वत: आपण यापुढे शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार गटात भूकंप, बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं काहीतरी घडतंय?
शरद पवार आणि अजित पवार
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणीत सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आज रात्री छत्रपती संभाजीनगर येथे येवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची भेटीची नुकतीच बातमी समोर आली होती. तसेच बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितलं होतं. यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. हे सगळं घडत असतानाच आता खुद्द बाबाजानी दुर्राणी हे छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. विशेष म्हणजे बाबाजानी दुर्राणी यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना सांगितलं आहे.

“आम्ही शरद पवार यांना भेटायला आलो होतो. त्यांनी भेटायचा वेळ दिला होता. मी शरद पवारांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे. मी सुरुवातीपासून 1985 पासून शरद पवारांच्यासोबत आहे. मध्यंतरी थोडं आठ-दहा महिन्यांचं डायव्हर्जन झालं. समविचारी पक्षांसोबत काम करणं योग्य आहे”, अशी भावना बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली.

“ज्याठिकाणी कार्यकर्ते, नेता आणि मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि नेत्यालाही कठीण होऊन बसतं. अजित पवार सध्या समविचारी पक्षांसोबत नाहीत. भाजप आणि शिंदेंची शिवसेनेसोबत काम करणं कार्यकर्त्यांना अवघड होतं. काही निर्णय असे होतात. पण सुबक का भूला शाम को लौट जाए तो उसे भूला नहीं कहते. मी ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे”, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

दोन दिवसांत काय-काय घडलं?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी आता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार हे जवळपास स्पष्ट झालंय. परभणीत जयंत पाटलांच्या बैठकीला बाबाजानी दुर्राणींचे पुत्र जुनैद दुर्राणी हजर राहिले आणि वडील बाबाजानी दुर्राणींसाठी पाथरीतून विधानसभेचं तिकीटही मागितलं. विशेष म्हणजे या बैठकीच्या एक दिवसाआधीच बाबाजानी दुर्राणींच्याच घरी जयंत पाटील आले होते. जयंत पाटलांनी दुर्राणींच्या घरी जेवणंही केलं आणि आता दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटलांकडे जुनैद दुर्राणींनी तिकिटाची मागणीही केली. तर जयंत पाटलांनीही सत्कारात्मक प्रतिसाद दिलाय.

बाबाजानी दुर्राणी कोण आहेत?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपलीय. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे परतण्याचा निश्चय बाबाजानी यांनी केल्याचं दिसतंय. बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं.

नरहरी झिरवळ यांच्या मुलाचीही तिकीटाची मागणी

दोन दिवसांआधी अजित पवारांसोबत असलेले आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्रही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजर राहिले आणि दिंडोरीतून तिकीटाची मागणी केली. वडिलांची निष्ठा अजित पवारांसोबत पण मी शरद पवारांसोबत असून वडील उभे राहिले तरी मी लढणार असं गोकूळ झिरवाळ म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी, निलेश लंके अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे आले आणि खासदारही झाले. आता विधानसभा निवडणुकीला 3 महिने बाकी आहेत. त्यामुळे एक एक नेता पवारांकडे वळताना दिसतोय. निलेश लंकेंनंतर बाबाजानी दुर्राणींचा नंबर लागताना दिसतोय.