दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर | 11 जानेवारी 2024 : सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि मदत हवी, असं आपण म्हणतो. त्यानुसार सरकार, लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमांतून नागरिकांना खरंच मदत करण्याचा प्रयत्नदेखील करताना दिसतात. पण नागरिकांना त्या मदतीची जाणीव असायला हवी. तसेच ती मदत कुणाला दिली जातेय याचं भान असायला हवं. सर्वांना समान मदत मिळायला हवी ही भावना ठेवायला पाहिजे. कारण सर्वसमावेशक भावनेतून सर्वांपर्यंत मदत पोहोचू शकते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट, स्पोर्ट किट आणि कामगार किट वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण या कार्यक्रमात काही जणांनी प्रचंड गर्दी करत किटच्या पेट्या पळवत नेल्या. त्यांच्या पेट्या पळवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतोय.
गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर उपसा सिंचन योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार प्रशांत बंब यांच्याकडून किट वाटप करण्यात येत होतं. यावेळी मोठा गोंधळ उडाला. यावेळी पेट्या पळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पेट्या पळविण्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन कोलमडलं आहे. अनेकजण पेट्या पळवून नेण्यात यशस्वी ठरले आहेत.
गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट, स्पोर्ट किट, कामगार किट वाटपासाठी ठेवले होते. मात्र हे किट वाटप करत असताना गोंधळ उडाला. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीने सर्व पेट्या पळवायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे प्रशासनाकडून जाळ्या लावण्यात आल्या होत्या. पण त्या जाळ्या तोडून लोकांनी पेट्या पळवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे छोट्या पेट्यांचीदेखील लुटालुट करण्यात आली आहे. वेगवेगळे गाव आणि कामगारांना या पेट्यांचं वाटप केलं जाणार होतं. मात्र त्या गावच्या गावकऱ्यांना न मिळता दुसऱ्याच लोकांनी त्या पेट्या पळवून नेल्या आहेत.