छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : आदर्श नागरी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. 40 ते 50 हजार ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्यानं मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा मुहूर्त साधत मोर्चा निघाला. मात्र पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. भडकल गेटवरुन निघालेला मोर्चा स्मार्ट सिटी ऑफिसच्या दिशेनं निघाला. याच ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. त्यामुळे पोलिसांचा ताफाही तैनात होताच. तर खासदार इम्तियाज जलील मंत्र्यांच्या भेटीसाठी आग्रही होते.
अखेर ज्या ठिकाणी हमखास मैदानाजवळ मोर्चा रोखला तिथं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन आले. आदर्श नागरी पतसंस्थेच्या चालकांच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देऊ, असं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी हा मोर्चा थांबवला.
छत्रपती संभाजी नगरातील आदर्श नागरी पतसंस्थेचा घोटाळा जवळपास 200 कोटींचा आहे. पंतसंस्था चालक अध्यक्ष अंबादास मानकापेंसह 50 जणांवर गुन्हाही दाखल झालाय. 22 लाखांची ठेव बुडाल्याच्या भीतीनं रामेश्वर इथर या 38 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्याही केलीय. आकर्षक व्याजदर, दामदुप्पट योजना, विनातारण कर्ज अशा योजनांद्वारे लाखो ठेवीदार पंतसंस्थेनं जोडले. मात्र जवळपास 200 कोटी संचालक मंडळानंच लुटल्याचं समोर आलं.
पतसंस्थेच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करणार असं मुख्यमंत्रीही म्हणालेत. ठेवीदारांना पैसे मिळतीलही. पण पतसंस्थेचं हे पहिलंच प्रकरण नाहीय. याआधीही अशा बँकांचे घोटाळे समोर आलेत. त्यामुळं आता तरीही आकर्षक व्याजाच्या आमिषाला बळी पडून, घामाचा पैसा मातीमोल होऊ देऊ नका.