विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसे आक्रमक झाली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांची तोफ धडाधडली. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांवर त्यांनी चांगलेच तोंडसूख घेतले. शरद पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी खास ठाकरी शैलीत त्यांनी अनेक मुद्यांवर सडेतोड भूमिका जाहीर केली.
त्यांना दंगली घडवायच्या आहेत
पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.शरद पवार यांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केलं. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे. जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, देशातही आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
माझं मोहोळ उठल ना…
माझ्या दौऱ्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझं मोहोळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
समाजात तेढ निर्माण करायची आहे
तुम्हाला तुमचं राजकारण करायचं आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे. यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटतं आमचे एवढे खासदार आले. त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात, असा सवाल त्यांनी केला.
ते तर मोदींविरोधी मतदान
मुस्लिम आणि दलितांनी देशभर मोदी विरोधात मतदान केले. संविधान बदलणार हे भाजपवालेच बोलत होते. इतर कुणी नरेटिव्ह केलेले नाही. त्यामुळे लोक भडकली. त्यांनी विरोधात मतदान केले. पण ठाकरे-पवार यांना वाटतं, की त्यांच्यावरील प्रेमाखातर मतदान केलं. पण त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.