बीड : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप 150 चा नारा देत आहे. नारे कसले देता? निवडणुका घ्यायला तुमची फाटते का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपला आम्ही 60 वर ऑल आऊट करू असा दावाही राऊत यांनी केला.
संजय राऊत मीडियाशी बोलत होते. मुंबई महापालिका निवडणूक घ्यायला का फाटते? तेवढच सांगा. घ्या निवडणुका पळ कशाला काढताय? न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात? किरे रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून का जावं लागलं हे सांगा. नाही तर मी सांगेल भविष्यात. या विषयी खुलासा केला. न्यायालयाचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे. कायद्याचा गैरवापर सुरू आहे. न्यायालयाचा वापर सुरू आहे. अशा प्रकराणावर बोला. खुलासा करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं.
150 जागा जिंकणार आहात. या मैदानात. पळ कशाला काढता? कर्नाटकात 200 जागा जिंकणार होता. तशी भाषाही तुम्ही केली होती. कर्नाटक जिंकण्यासाठी सर्व फौज उतरवली. अख्खं मंत्रिमंडळ उतरवलं. फक्त राष्ट्रपतींना उतरवण्याचे बाकी होते. काय झालं कर्नाटकात? ते 150 ची भाषा करतात त्यांना 60 मध्ये ऑलआऊट करू, असं राऊत म्हणाले.
मागच्या लोकसभेत शिवसेनेचे 19 खासदार होते. 18 महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्राबाहेर. आमचा लोकसभेतील 19 चा आकडा कायम राहील. कदाचित वाढेलही. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. त्यात कुणाला त्रास होण्याचं कारण नाही. कदाचित त्यात वाढही होईल, असंही त्यांनी सांगितलं.