‘उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपसोबत जाणं…’, रवी राणांच्या दाव्यावर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण

| Updated on: Feb 19, 2024 | 3:49 PM

आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आगामी काळात भाजपसोबत जाणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

उद्धव ठाकरे एकवचनी, भाजपसोबत जाणं..., रवी राणांच्या दाव्यावर चंद्रकांत खैरेंचं स्पष्टीकरण
Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 प्रतिनिधी, छ. संभाजीनगर | 19 फेब्रुवारी 2024 : आमदार रवी राणा यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपसोबत जातील, असा दावा रवी राणा यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमदार रवी राणा यांना कुठून स्वप्न पडलं? उद्धव ठाकरे हे एकवचनी आणि एक बानाचे नेते आहेत. आधीच तुम्ही लोकं उद्धव ठाकरेंना त्रास देत आहात. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणे कदापि शक्य नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

यावेळी त्यांना आमदार नितेश राणे यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं. “आमदार नितेश राणे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते चालत होते. ज्यांनी मोठं केलं त्यांनाच बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. या पोट्ट्याला काहीही कळत नाही. त्याच्या बापाला मोठं कोण केलं? उद्धव ठाकरे संयमी आहेत म्हणून आम्ही शांत आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर दिलं असतं”, असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिलं.

‘अशोक चव्हाण माझे चांगले मित्र’

“भाजप नेते अशोक चव्हाण माझे चांगले मित्र आहेत. त्यांचं भाजपमध्ये जाणं हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा अपमान आहे. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करायला पाहिजे होता. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रवेश करून हलकेपणा करून घेतला. त्यांचा भाजप प्रवेश योग्य नव्हे तर चुकीचे केले”, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

‘जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत’

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या अनेक वेळा वावड्या उठल्या. मुद्दाम वावड्या उठविण्याचे काम भाजप करते आहे. जयंत पाटील हे शरद पवारांना पुतण्या पेक्षा जवळचे आहेत. पुतण्याने धोका दिला. मात्र जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला. ते भाजपमध्ये जाणार नाहीत”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

‘भाजपकडून दबाव तंत्राचा वापर’

“भाजपकडून दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. संपूर्ण देशात असेच सुरू आहे. भाजपला कामगार, उद्योगपती, शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा भाजपलाच फटका बसणार आहे. लोकांनी साथ दिली तरच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करणार नाहीत”, असंही खैरे म्हणाले.

“खासदार इम्तियाज जलील यांचं काय चालू आहे हे समजत नाही. उभे राहणार की नाही, किंवा घाबरले असतील. त्यांचे नातेवाईक देखील त्यांना सध्या लाईक करीत नाहीत. त्यांच्यावर बहिष्कार घातल्याचे दिसत आहे”, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.