शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि सध्याचे विद्यमान उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज अखेर त्यांच्या निवृत्तीचा घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार? यावरुन सुरुवातीला वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचंदेखील नाव चंद्रकांत खैरे यांच्यासोबत चर्चेत होते. पण पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करण्यात आली. आपण फक्त आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहोत. पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली. पुढची लोकसभा निवडणूक अंबादास दानवे किंवा पक्ष देईल त्याने निवडावी, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
“मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल. त्यामुळे अनेकांचं लक्ष आमच्याकडे आहे. मात्र विरोधक काय हालचाली करत आहेत त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. महागाई वाढली, बेरोजगारी वाढत चालली, त्यांचं लक्ष जनतेकडे नाही. फक्त अमदारांकडे लक्ष देत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच आमचा प्रचाराचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होतोय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार याचं आमच्यावर खूप प्रेम आहे. ते 20 तारखेला येत आहेत”, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली.
“आमच्याकडचे 5 ते 6 गद्दार आहेत, त्यांना आता तिकीटपण भेटलं नाही. ते आता रडत बसले आहेत”, अशी टीका चंद्राकांत खैरे यांनी केली. दरम्यान, “काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी सुद्धा आमच्या प्रचाराला येऊ शकतात. शेतकऱ्यांचे काय हाल सुरू आहेत, महागाई वाढली आहे, या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय. आमची फाईट एमआयएमशी आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी कोणतं काम आणलं ते मला सांगा. मी 1989 पासून या शहराला शांत ठेवलं. इम्तियाज जलील यांना अजून दिल्ली माहीत नाही. भाजप नेते भागवत कराड यांनाही दिल्ली माहीत नाही”, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.
“मंत्री संदीपान भुमरे यांनी अडीच वर्षात कोणतं काम आणलं? ते सांगा. एमआयएम ही व्होट कटावो पार्टी आहे. 5 वर्षांपूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आताचे हर्षवर्धन जाधव यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे त्यांचा काही फरक पडणार नाही. सर्व जाती-धर्माचे लोक आमच्यासोबत आहेत. मी फक्तं हीचं 5 वर्ष काम करणार आहे. 2029 ला मी निवडणूक लढवणार नाही”, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
“आमचं भाजपसारखं हिंदुत्व नाही, असंही खैरे यावेळी म्हणाले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना सुध्दा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. या लोकांनी बाळासाहेबांच्या नावावर खोटी भाषणं केली. निधी मिळत नाही म्हणून अजित पवार यांच्यावर बोलल”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.