उद्धव ठाकरे यांनी भर सभेत व्यक्त केली नाराजी, म्हणाले, ‘माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य…’

| Updated on: Jul 07, 2024 | 3:32 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. संभाजीनगरची जागा ठाकरे गटाच्या हातातून निसटली. तिथे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा मोठ्या मताधिक्यानी पराभव झाला. या पराभवावर ठाकरेंनी भर सभेत आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी भर सभेत व्यक्त केली नाराजी, म्हणाले, माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य...
उद्धव ठाकरे
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांचा संभाजीनगर येथे मेळावा पार पडला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचा विजय झाला. या निकालाचं आपल्याला दु:ख झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनातलं शल्य बोलून दाखवलं. “लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो. शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय. पहिल्या प्रथम मुद्दाम संभाजीनगरला आलो आहे. कारण गद्दार इकडून दुर्दैवाने जिंकले आहेत. तुम्ही काल जिंकला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. मी संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

“आपण एक विचार केला पाहिजे की, महाराष्ट्रात मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होतं. त्यांना आपण 40 वरुन 9 वर आणलं. पण या विजयात माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही. हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनाही झालं असणार. अरे हेच ते संभाजीनगर ज्याला आपण मराठवाड्याची राजधानी म्हणतो. याच संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची, भगव्याची बिजं शिवसेनाप्रमुखांनी रोवली, आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा पादाक्रांत केला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांच्या पराभवावर ठाकरे काय म्हणाले?

“मराठवाड्यात इतर सर्व भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले. पण हक्काची संभाजीनगरची जागा गमवावी लागली. त्यामागील कारण काहीही असेल. पण हार ही झालेली आहे. आपण अतिआत्मविश्वासाने लढलो का? असेल. कारण आपला उमेदवार चंद्रकांत खैरे हे कित्येक वर्ष तुमच्यासारखे पराभव झाला तरी सुद्धा शिवसेना एके शिवसेना, भगवा एके भगवा, दुसरा कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही. त्यांनाही आमिष दाखवले गेली असतील पण तरीसुद्धा ते निष्ठेने राहिले. त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळी उमेदवारी देवून केला होता. कारण निष्ठा शेवटी महत्त्वाची असते”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरे यांचं कौतुक केलं.

“हार आणि जीत होत असते. निवडणुकी येतात, निवडणुका जातात, पुन्हा निवडणुका येतात. निवडणुकीत हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही. पण लढल्याची हिंमत हरलो तर आयुष्य संपतं. मी लढणार आहे. मी हिंमत हरणार नाही. निवडणूक हरलो तरी पुन्हा जिंकेन या इच्छेने मी संभाजीनगरमध्ये आलो आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.