छत्रपती संभाजी नगर (महेंद्रकुमार मुधोळकर) : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांबद्दल बोलताना कणकवलीचे आमदार, भाजपा नेते नितेश राणे हे शब्द आणि भाषा याचा फारसा विचार करत नाहीत. घणाघाती टीका करताना ते अत्यंत बोचणाऱ्या, टोचणाऱ्या शब्दांची निवड करतात. आता ठाकरे गटाच्या सुद्धा एका नेत्याने त्यांच्याबद्दल अशीच भाषा वापरली आहे. “लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. ठाकरे गट अधिक जागांवर निवडणूक लढवेल. वंचितला अकोला मतदार संघाची जागा देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यावर नाराज नाहीत, ते उध्दव साहेबांचे चांगले मित्र आहेत” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ते छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार आहेत. शिवसेनेमधील फुटीनंतरही ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिलं होतं. पण त्यांचा पराभव झाला होता.
मराठा आरक्षणाच्या विषयावरही त्यांनी मत व्यक्त केलं. “आरक्षणाच्या मागणीसाठी हे सरकार आश्वासक वाटत नाही. जरांगे पाटील यांना भेटून सरकारने मार्ग काढायला हवा” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. “मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे” असं चंद्रकात खैरे म्हणाले. त्यांनी भाजपा नेते नितेश राणे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. नितेश राणे ठाकरे गटाबद्दल बोलताना बऱ्याचदा जी भाषा वापरतात, तशीच भाषा चंद्रकांत खैरे यांनी वापरली.
‘त्याचा बाप उद्धव साहेबांच्या पुढे झुकून नमस्कार करतो आणि हा….’
“नितेश राणे फालतू माणूस आहे, शेंबडा आहे. त्याला फार अक्कल आलीय का?, त्याला आता चांगले उत्तर द्यावे लागेल. त्याचा बाप उद्धव साहेबांच्या पुढे झुकून नमस्कार करतो आणि हा पोट्टा काहीही बोलतो. यामुळे भाजपला फटका बसणार आहे. भाजप आणि संघाला काहीही कळत नाही” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. “कुटुंब आणि राजकरण वेगळे असते. राजकारण बाजूला ठेवून कुटुंब एकत्रित आले” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. नरेंद्र मोदीजी यांनी असं बोलणं शोभत का? मोदी यांच्या अनेक भाष्यामुळे लोकांमध्ये वाईट निरोप गेला आहे” असंही खैरे म्हणाले.