मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात संभाजी राजे छत्रपती यांनी सहभाग घेतला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी म्हटले होते. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार आहे, अशी घोषणा संभाजी राजे छत्रपती यांनी केला.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यावेळी मी महाराष्ट्रात नव्हतो. संतोष देशमुख यांना क्रूर पद्धतीने मारले गेले. संतोष देशमुख यांना ज्या क्रूरपणे मारले गेले, ते दुर्देव आहे. शिवाजी महाराजांच्या घरात जन्म होऊनही मला ते पाहावले नाही. शाहू, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे काय झाले? असा प्रश्न मला पडला.
संभाजीराजे म्हणाले, मी संतोष देशमुख यांच्या घरच्या लोकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा एकच निर्णय घेतला. तो निर्णय हा होता. हा या प्रकरणाचा जो महोरक्या आहे. त्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो, तो नेता धनंजय मुंडे आहे. या लोकांना आश्रय देणाऱ्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी त्यावेळी सांगितले होते. परंतु त्यांना मंत्रिपद दिले. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले.
संभाजीराजे पुढे म्हणाले, आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार आहे. काय चालले या बीडमध्ये? बीडचा बिहार करायचा का? त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. हा महाराष्ट्र आपला आहे.