अक्षय मंकणी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. शाब्दीक चकमकीनंतर बघता बघता दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत वाहने जाळली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा पथके स्थापन केली असून या समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे, आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.
खासदारांवर केले आरोप
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी MIM चे खासदार इम्तियाज जलील यांना लक्ष केलंय. इम्तियाज यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम युवा वर्गावर झाला. त्यामुळे दंगल भडकली. दंगलीत अर्धा तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? असा सवाल त्यांनी केला. आमचं शहर अंतकवादी लोकांच्या हिटलिस्टवर आहे. आम्हाला काही शांतता भंग करायची नाही. ज्या लोकांनी हे घडवून आणल आहे, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा मी बोलणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
दंगल घडवून आणलेली
संभाजीनगरमधील दंगल ही घडवून आणलेली आहे. हे लोक मूर्ख आहेत त्यांना काय बोलायचं हे कळत नाही. शहराची शांतता कोणी बिघडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली आहे. विरोधकांकडून या विषयावर राजकारण केले जात असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. लोकशाहीमध्ये कुणी आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला रोखलं तर त्यांच्या भावना तीव्र होतात आणि नंतर तेच बोलणार की,लोकशाहीचा गळा घोटला गेला. त्या लोकांच्या हातातून हिंदूच राजकारण निघून गेला आहे त्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे, असा आरोप त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर नाव न घेता केला. ही घडवून आणलेली दंगल असल्याचे आरोप त्यांनी केला.
संजय राऊत इतिहास विसरले
संजय राऊत यांना काय माहिती? 1985 ते 1989 पर्यंत आम्ही संभाजीनगरमधील 22 दंगली हँडल केल्या आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: लक्ष देत होते. संजय राऊत यांना हा इतिहास माहीत नाही, असे शिरसाट यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांचा विषय संपला
आपल्याकडून सुषमा अंधारे हा विषय संपला आहे. तो किरकोळ विषय होता. त्यावर आता आपण बोलणार नसल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. तानाजी सावंत याना सोलापूरचे पालकमंत्रीपद मिळाले नाही, यामुळे ते नाराज असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याच्या संदर्भ आपणास माहीत नाही, असे सांगत त्यावर अधिक बोलणे टाळले.