दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आमदार-खासदार यांचा अयोध्या (Ayodhya) दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हिंदुत्व रक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं या दौऱ्याच्या माध्यमातून ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचा ताफा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचं पूजन करायला अयोध्येत चालले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर अयोध्येत जाऊन पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात काही मर्दुमकी नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेना पदाधिकारी तसेच काही भाजप नेतेदेखील अयोध्या दौऱ्यासाठी लखनौच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या अयोध्येत श्रीरामांची महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीवरून टीका करताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण चोरून त्याचा पूजन करायला चालले आहेत. उध्दव साहेब अयोध्येत जाऊन पाहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतीही मर्दमुखी नाही. शरयू नदी पवित्र आहेच. मात्र यांनी तर गंगा मैली करून टाकली आहे. त्यामुळे हे लोक शरयुत जातील किंवा गंगेत जातील काहीही फरक पडणार नाही..
विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार कालपासून नॉट रिचेबल होते. दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा रंगली होती. अखेर आज ते पुण्यातील एका लग्न समारंभात पत्नीक दिसून आले. यावरून अंबादास दानवे यांनी आक्रमक सवाल केलाय. अजित पवारांना प्रायव्हसी आहे की नाही, एखादा दिवस नॉट रीजेबल राहिले तर काय होतं? असा सवाल दानवेंनी केलाय.
गौतम अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळं मत मांडल्याने महाराष्ट्रात मविआमध्ये फूट पडणार का, या चर्चांना उधाण आलंय. दानवे यांनी यावरून स्पष्ट मत व्यक्त केकलं. पवार यांनी वेगळं मत मांडलं म्हणून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, असं समजायंच कारण नाही, असं दानवेंनी स्पष्ट केलं. शरद पवारांनी व्यक्त केलेलं मत हे योग्य आहे, निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करावी असं मत व्यक्त केलं. त्यामुळे पाठीशी घालत आहेत असं म्हणता येत नाही, असंही दानवे यांनी म्हटलं.