छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूरच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरच्या जागेसाठी इच्छुक होते. पण आपल्या वडिलांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संभाजीराजे यांनी माघार घेतली होती. तसेच आपण आपल्या वडिलांना जिंकून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करु, असं संभाजीराजे म्हणाले होते. त्यानंतर शाहू महाराजांना दोन दिवसांपूर्वी काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली. यामुळे संभाजीराजे छत्रपती भारावले आहेत. त्यांनी ट्विटरवर (X) याबाबत पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी आपल्या वडिलांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसेच निवडणुकीत जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“गेले तीन दिवस शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या आणि निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले”, असं संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला… pic.twitter.com/x4hOQDAuiY— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 23, 2024
“खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून आणि प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.